मुंबई - वयाच्या ८९व्या वर्षी जेष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे आज वृद्धापकाळाने देहावसान ( Rekha Kamat Passes Away ) झाले. अतिशय गोड स्वभावाच्या रेखा कामत आताआतापर्यंत मनोरंजनसृष्टीत कार्यरत होत्या. गेल्या काही वर्षांत त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव कामं बंद केली होती. परंतु त्यांनी ज्या ज्या मालिका, नाटकं आणि चित्रपटांतून कामं केली तिथल्या सर्व कलाकार आणि युनिटच्या त्या लाडक्या होत्या. शेवटपर्यंत त्यांचा मिश्किल स्वभाव लोकांचे मनोरंजन करीत होता.
अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्या भगिनी -
रेखा कामत या चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्या पत्नी होत्या. तर अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्या भगिनी होत्या. या दोन्ही सख्ख्या बहिणींनी मराठी सिनेमासृष्टीमध्ये आपल्या कामाची छाप पाडली आहे. मागील काही वर्षांपूर्वी प्रकृती खराब असल्याने रेखा कामत कलाविश्वापासून लांब झाल्या होत्या.
अभिनेत्री रेखा कामत यांची कारकिर्द -
लहानपणीच्या कुमुद सुकथनकर म्हणजेच आताच्या रेखा कामत यांनी नृत्यनाटिकांमधून कामं केली आणि त्यातूनच त्यांना चित्रपटात कामं करण्याची संधी मिळून गेली. राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रिमूर्तीचा १९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा त्यांचा पहिला चित्रपट. कुमुद हे नाव त्याकाळी थोडे पूर्वकालीन वाटले म्हणून गदिमांनी त्यांचे नामकरण रेखा असे केले आणि तेच नाव पुढे खूप प्रसिद्ध झाले.
मराठी सिनेसृष्टीतील रेखा -
रेखा कामत यांचा (यात त्यांची बहीण कुमुद उर्फ चित्रा नवाथे सुद्धा होती) ‘लाखाची गोष्ट’ गाजला आणि मराठी चित्रपटसृष्टीला रेखा यांच्या रूपाने सुस्वरूप, उत्तम, घरंदाज, प्रेमळ, शालीन आणि सुसंस्कृत अभिनेत्री मिळाली. ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ यातील त्यांच्या भूमिका गाजल्या. केदार शिंदे चा ‘अगंबाई अरेच्चा’ चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील त्यांची माई आजी प्रेक्षकांची लाडकी बनली होती. त्याआधी त्यांनी ‘सांजसावल्या’ आणि पहिली मालिका ‘प्रपंच’ मधून काम केले होते.
रेखा कामत या अनेक जाहिरातींचा भाग होत्या आणि मराठी रंगभूमीवरही त्यांनी भरपूर काम केले. त्यांनी पाच हजाराहून अधिक नाटकांतून भूमिका केल्या होत्या. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकं, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ सारख्या अनेक व्यावसायिक नाटकांतून त्यांनी विविधांगी भूमिका रंगविल्या.
रेखा कामत यांची एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, याला जीवन ऐसे नाव या मराठी मालिका चांगल्याच गाजल्या होत्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेत अभिनेता स्वप्नील जोशी याने साकरलेल्या 'घना' च्या आजीची भूमिका देखील विशेष गाजली होती.
गाजलेली नाटके -
रंगभूमी आणि व्यासपीठावर प्रचंड प्रेम असणाऱ्या रेखा यांनी नाटकातही काम केलेले आहे. त्यांची ऋणानुबंध, संगीत एकच प्याला, गंध निशिगंधाचा, गोष्ट जन्मांतरीची, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझे आहे तुजपाशी, दिल्या घरी तू सुखी राहा, प्रेमाच्या गावा जावे, मला काही सांगायचं आहे, लग्नाची बेडी, सुंदर मी होणार, संगीत सौभद्र ही त्यांची मराठी रंगभूमीवर गाजलेली नाटकं आहेत.
हेही वाचा - Lata Mangeshkar Corona Positive : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण