मुंबई - राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी परवानगी मिळावी, यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी अर्ज केला आहे. मात्र अनिल देशमुख यांच्या अर्जाला अभिनेत्री केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे आणि घनश्याम उपाध्याय यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सोमवारी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे
अनिल देशमुख फरार होतील - शरद पवारांबाबत फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर सध्या कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळेच्या वकिलांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध केला आहे. अनिल देशमुखांचा जामिन अर्ज फेटाळण्यासाठी विनंती अर्ज योगेश देशपांडे आणि घनश्याम उपाध्याय यांच्या वतीने सीबीआय विशेष न्यायालयात सादर करण्यात आला आहे. राज्यसभेसाठी मतदान करता यावे, म्हणून अनिल देशमुख यांनी एक दिवसाचा जामीन मागितला आहे. जर देशुमख फरार झाले तर त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि ईडीला सहकार्य करणार नाहीत. अनिल देशमुख मिळून येत नाहीत, असा अहवाल अदृश्य हाताच्या सांगण्यावरुन सादर करतील, याची केतकी प्रकरणावरुन खात्री पटते असेही केतकीचे वकील म्हणाले.
8 जून रोजी होणार सुनावणी - राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी सोमवारी सुनावणीवेळी ईडीने उत्तर दाखल करण्याकरिता 7 जूनपर्यंत वेळ मागितल्याने आज या अर्जावर युक्तिवाद करण्यात आला नाही. आता या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहे. मात्र 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक असल्याने जर सत्र न्यायालयाने मंजुरी नाकारल्यास महाविकास आघाडीला अतिशय कमी वेळ मुंबई उच्च न्यायालयात जाण्याकरिता मिळण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे.
भाजपसह महाविकास आघाडीला लागणार अपक्षांची मदत - विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ आणि राज्यसभेच्या विजयाचा कोटा या दोन्हीचा ताळमेळ बसून सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे. विधानसभेत 13 अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 53 आमदार असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात अर्ज केला आहे. विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या 54 वर आली आहे. विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी अपक्ष आमदारांची वर्षावर बैठक घेतली आहे. या बैठकीतील किती अपक्ष आमदार शिवसेनेच्या सोबत जातील यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.