मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसून आझाद मैदानात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे तरुण आंदोलन करत आहेत. आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य गेट बाहेर विष पिण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगसावधान राखत पोलिसांनी त्यांना रोखले. अखिल भारतीय छावा ससंघटनेच्या 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नसेल. तर आम्ही मंत्रालयात येऊन विष पिऊन आत्महत्या करू, असा इशारा छावा संघटनेने दिला होता. परंतु आजअखेर कोणताच निर्णय न झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील पदाधिकारी मुंबईत पोहचले. यामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे, जिल्हाकार्याध्यक्ष राधाकिसन शिंदे, अंबड तालुकाध्यक्ष राधेश्याम पवळ आणि घनसावंगी तालुकाध्यक्ष नानासाहेब जोगदंड आणि युवक जिल्हासंघटक ज्योतिराम माने यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य गेट बाहेर विष पिण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच त्यांना पोलिसांनी रोखले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आरक्षण, नोकर भरती, नियुक्त्या आदी विविध मुद्द्यांवर हे आंदोलन सुरू आहे. वेळोवेळी विरोधीपक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेटही घेतली. मात्र, असे असले तरी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, असा आरोप छावा संघटनेने केला आहे.