मुंबई - जगभरातील कुठल्याही विमानतळावर प्रवेश करताना, कुठल्याही अपवादाविना, सुरक्षा तपासणी अतिशय महत्वाची आणि अनिवार्य असते. भारतामध्येसुद्धा याचे काटेकोरपणे पालन केले जाते. कोणीही ते टाळण्याचा प्रयत्न करत नाही आणि केलाच तर त्याच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता असते. नुकतीच ‘टायगर ३’ च्या चित्रीकरणासाठी त्या सिनेमाची टीम रशियासाठी रवाना झाली, ज्यात कतरीना कैफ आणि सलमान खानसुद्धा होते.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक होऊ शकते पण... - कायदेतज्ज्ञ असीम सरोदे
- 'टायगर ३’ची टीम रशियाला रवाना -
सलमान खान विमानतळावर येणार हे माहित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ‘पॅपराझी’ हजर होते. तो मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर फोटोग्राफर्समध्ये झुंबड उडाली, त्याचे फोटो काढायला, ते चांगल्या अँगलने मिळवायला, परिणामी विमानतळावर एकच गलका झाला होता. त्या सर्वांना चकमा देत सलमान खान लगबगीने विमानतळाच्या प्रवेशदारापर्यंत पोहचला. सलमान खान विमानतळाच्या प्रवेशद्वारापर्यंत जायला निघाला असताना, दरवाजावर तैनात असलेल्या सीआयएसएफ अधिकाऱ्याने त्याला थांबवले आणि विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी त्याची सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यास सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानतळावर सलमानच्या मागे उफाळणाऱ्या गर्दीवरही नियंत्रण ठेवले.
- सलमान खानला सुरक्षा तपासणी करण्यास सांगितले होते -
आपली ड्युटी इमानेइतबारे करणाऱ्या त्या सीआयएसएफ अधिकाऱ्याची नेटकऱ्यांनी स्तुतीच केली. परंतु, आता त्याच अधिकाऱ्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. त्या अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ होणार असल्याचेही कळते. सलमान खानला कायद्याप्रमाणे सुरक्षा तपासणी करण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याला मीडियाशी बोलण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीआयएसएफ अधिकारी मुंबई विमानतळावर आपले कर्तव्य बजावत होते. तेव्हा त्यांनी सलमानला पहाटे विमानतळावर सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी सांगितले होते. हे तेथील उपस्थित ‘पॅपराझी’ ने टिपले होते व ती बातमी सर्वदूर पोहोचली. मात्र, त्यानंतर त्या अधिकाऱ्याने त्या प्रकाराबद्दल ओडिशामधील एका मीडिया संस्थेशी बोलल्याची माहिती आहे. तो प्रोटोकॉलचा भंग मानला जातो, ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याचा फोन जप्त केला, जेणेकरून तो पुढे मीडियाशी बोलू शकणार नाही. तसेच या एकंदर प्रकारावर जास्त बवाल होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.
हेही वाचा - नारायण राणेंना भाजपचा पूर्ण पाठिंबा - देवेंद्र फडणवीस