मुंबई - कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी मुंबई शहरामध्ये विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अशाच एका कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकाने कोयता उगारल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
उत्तर मुंबई परिसरात महानगरपालिकेचे अधिकारी उन्मेष राणे व एक महिला कर्मचारी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत होते. तेव्हा एका व्यक्तीने अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर त्याने जवळचा कोयता अधिकाऱ्यांवर उगारला. ही व्यक्ती कोण होती, याचा उलगडा झालेला नाही. तसेच याप्रकरणी गुन्हाही दाखल झालेला नाही.
1 लाखांहून अधिक नागरिकांवर कारवाई
मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 1 लाख 60 हजार नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान दंड भरला नाही तर, रस्त्यावरील कचरा साफ करण्याचं काम सुद्धा करून घेतले जात आहे.
गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल
मुंबई शहरामध्ये गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये मास्क न वापरण्याच्या संदर्भात पहिला गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी प्रथमेश जाधव (29) या व्यक्तीवर कलम 186,188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आतापर्यंत 40 हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. याअगोदर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महानगरपालिका 200 रुपये दंड घेत होती. मात्र हा दंड वाढवून 400 रुपये करण्यात आला आहे.
हेही वाचा- पुलावामाचे राजकारण करणाऱ्यांना देश कधी विसरणार नाही; त्यांचा बुरखा फाटला आहे - मोदी