मुंबई - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. देवीदास मोरे (वय 30) असे या आरोपीचे नाव आहे. 5 डिसेंबर 2019 रोजी विलेपार्ले रेल्वे स्थानकावर एका 16 वर्षीय मुलीचा आरोपीने विनयभंग केला होता.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की 5 डिसेंबर 2019 रोजी आरोपी देवीदास मोरे याने विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 4 वर लोकलच्या लेडीज डब्यात चढणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. घटनेवेळी मुलगी भयभित झाल्याने घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांनी या मुलीकडे धाव घेतली, व तिच्याकडे विचारपूस केली. मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आले होते.
आरोपीचे न्यायालयाला पत्र
पोलिसांनी आरोपीला अटक करून, त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते, आरोपी आतापर्यंत तुरुंगात होता. गेल्या महिन्यात आरोपीने न्यायालयाला पत्र लिहिले होते, या पत्रात आरोपीने म्हटले होते की, तो मुळचा नांदेडचा आहे. कामासाठी मुंबईला आला होता. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. मात्र त्याला याप्रकरणात अटक झाली असून, गुन्हा मान्य आहे. दरम्यान आरोपीच्या पत्रानंतर न्यायाधीश एच.सी. शेंडे यांनी आरोपीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयाने असे म्हटले आहे की, आरोपीने केलेले सर्व गुन्हे सिद्ध झाले असून, त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात येत आहे.
हेही वाचा - मुंबईत मंगळवारी 3512 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 8 जणांचा मृत्यू