मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपा आणि शिवसेनामध्ये राडा पाहायला मिळाला आणि भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजपाचा 30 कार्यकर्त्यांवर तर शिवसेनेच्या 7 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये शिवसेनेच्या माजी महापौर आणि नेत्या श्रद्धा जाधव यांच्यासह सह आरोपींवर भाजपातर्फे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. मात्र, या सर्व शिवसैनिकांनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली.
शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये झालेल्या प्रकरणासंदर्भात उद्धव ठाकरे काय बोलणार?
या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यात शिवसैनिकांनी शांतता राखावी असे आवाहन केले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये झालेल्या या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी काय बोलणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
'शिवसेना भवनाच्या परिसरात झालेल्या प्रकरणाची घेतली माहिती' -
शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना लढ्यासाठी मुख्यमंत्री निधीत एक लाख रुपये जमा करण्यात आले. आमदार सदा सरवणकर, ट्रस्टच्या अध्यक्ष प्रिया गुरव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन हा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेना भवनाच्या परिसरात झालेल्या प्रकरणाची माहिती घेतली.
'आम्ही शांत कसे बसणार' -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यावर शिवसेना भवनावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही शांत कसे बसणार, अशी भूमिका मांडल्याचे आमदार सदा सरवणकर यांनी पत्रकारांना सांगितले.