मुंबई - 2013 मध्ये मुंबईत घडलेल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार संदर्भातील मुख्य आरोपींपैकी एक आरोपी आकाश जाधव यास मुंबई पोलिसांच्या युनिट 9 ने पुन्हा अटक केली आहे. आकाश जाधवसोबत त्याचा साथीदार अंकित अरुण नाईक या आरोपीलासुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.
27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस तपास करत असतानाही या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील मुख्य तक्रारदार हे त्यांच्या घरासमोर बसले असताना सदरच्या या दोन आरोपींनी त्यांच्या हातावर व डोक्यावर चाकूने वार करून जागेवरून फरार झाले होते. यासंदर्भात बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर क्राईम ब्रँच युनिट 9 कडून तपास केला जात होता. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता यातील दोन्ही आरोपी हे खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार गुन्हे या संदर्भातले आरोपी असलेले आढळून आले.
तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांना या दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता हे दोन्ही आरोपी डोंबिवली येथे लपले असल्याचे आढल्यानंतर पोलिसांनी त्यांना डोंबिवली येथून अटक केली आहे. शक्ती मिल गॅंग रेप संदर्भातील आरोपी आकाश जाधव याच्यावर एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये चार गुन्हे, आग्रीपाडा पोलीस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे तर आरएके मार्ग पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे. तर अंकित नाईक या आरोपीच्या विरोधात काळाचौकी व एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेला आहे.
काय आहे शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण
22 ऑगस्ट 2013 रोजी एका महिला फोटोग्राफर व आणखीन एका महिलेवर बलात्काराच्या संदर्भात एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या संदर्भात मोहम्मद कासिम हाफिस शेख, कासिम सलीम अन्सारी, विजय जाधव, सिराज रेहमान, खान मोहम्मद अश्फाक शेख व आकाश जाधव( यावेळी अल्पवयीन) होता. या आरोपींना अटक करण्यात आलेली होती.
ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणाचा खटला लढवला होता. 20 मार्च 2014 मध्ये सत्र न्यायालयाकडून पाच आरोपींना यामध्ये दोशी करार देण्यात आला होता. त्यामध्ये आकाश जाधव हा अल्पवयीन असल्यामुळे शिक्षा भोगून बाहेर आला होता.