मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप लावणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या तीन तक्रारींप्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) गोपनीय चौकशी करण्यात सुरवात केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.
तीन महिन्यांत होईल चौकशी!
पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे, पोलीस निरीक्षक अनुप डांगे आणि व्यावसायिक सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारींमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी आता गोपनीय चौकशी केली जात आहे. ही चौकशी तीन महिन्यांत पूर्ण केली जाते. ही एक प्रकारची प्राथमिक चौकशी असते. त्यात मिळालेल्या माहितीच्या आधारावर खुली चौकशी सुरू करण्यात येते अथवा गुन्हा दाखल करण्यात येतो अथवा तक्रारीची चौकशी बंद करण्यात येते. ज्या व्यक्तींनी या तक्रारी केल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून लवकरच त्यांचा अधिकृत जबाब नोंदवण्यात येणार असल्याचेही सूत्रांकडून समजते आहे.
दोन पोलीस आणि एका व्यावसायिकाकडून आरोप
पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीर सिंग यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता. पानी या 14 पत्राची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आली होती. या पत्रात घाडगेंनी परमबीर सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यातून काढण्यासाठी बेकायदेशिरित्या आदेश दिल्याचा आरोप केला आहे. तसेच डांगेंच्या तक्रारीतही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्याशिवाय व्यावसायिक सोनू जलाननेही त्याच्या तक्रारीत जबरदस्तीने पैसे घेण्यात आल्याचे आरोप केले होते. त्याप्रकरणी आता एसीबी अधिक चौकशी करत आहे.