मुंबई - बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेताना एका पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत विभागाने ( एसीबी ) अटक केली आहे. सात लाखांची लाच घेताना एसीबीने ही कारवाई केली ( ACB Arrested Police Inspector Bribe Case ) आहे. लाच घेणारा हा अधिकारी एन एन जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत मुंढे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. एका महिलेने नातेवाईकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. भरत मुंढे याने बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 37 लाखांची लाच मागितली. त्यातील पाच लाख रुपये स्वत:करता, 2 लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्याला आणि बाकी 30 लाख रुपये महिलेला देण्यात येतील, असे त्या नातेवाईकाला सांगितले. मात्र, एवढे पैसे कुठून आणणार, असा प्रश्न त्याला पडला. त्यानंतर याबाबत त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
नातेवाईकाने केलेल्या तक्रारीनुसार एसीबीकडून सापळा रचण्यात आला. नातेवाईकाकडून सात लाख रुपयांची लाच घेताना भरत मुंढेला एसीबीने अटक केली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरु आहे.