मुंबई - म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांनी मागील काही महिन्यांपासून भाडेच भरलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत भाड्यापोटी या रहिवाशांकडे म्हाडाची 129 कोटी थकबाकी असल्याची माहिती विनोद घोसाळकर, सभापती, दुरुस्ती मंडळ यांनी दिली आहे. ही मोठी रक्कम असून ती वसूल करण्यासाठी आता मंडळाने रहिवाशांना अभय योजना लागू केली आहे. त्यानुसार मंडळाने दिलेल्या निश्चित वेळेत थकबाकी भरल्यास व्याजात 40 ते 60 टक्क्यांची सवलत रहिवाशांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तेव्हा अधिकाधिक रहिवाशांनी याचा लाभ घेत भाडे भरावे, असे आवाहनही घोसाळकर यांनी केले आहे.
म्हणून भाडे थकवले
उपकर प्राप्त जुन्या अतिधोकादायक आणि कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात इमारतीचा पुनर्विकास होईपर्यंत स्थलांतरित केले जाते. तर त्यांच्याकडून काही भाडे घेतले जाते. त्यानुसार 21 हजार 149 रहिवाशी मुंबईतील विविध संक्रमण शिबिरात राहतात. मात्र, यातील अनेक रहिवाशांनी भाडे भरलेले नाही. त्यातही मार्च 2020 पासून भाडे थकबाकी वाढली आहे. कोरोना आणि टाळेबंदीचा आर्थिक फटका सगळ्यांना बसला आहे. त्यामुळे अनेक जण भाडे भरू शकले नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, भाडे न भरल्यास त्यावर व्याज आकारले जाते. त्यानुसार आता थकबाकी 129 कोटी 92 लाखावर गेली आहे.
अशी आहे अभय योजना
129 कोटी 92 लाख ही मोठी रक्कम आहे. तर रहिवाशांवरील थकबाकीचा बोजा ही वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार दुरुस्ती मंडळाने अभय योजना लागू केली आहे. या योजनेनुसार 28 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण थकीत भाडे भरल्यास व्याजावर 60 टक्के माफी मिळणार आहे. तर 1 ते 31 मार्चपर्यंत संपूर्ण थकीत रक्कम भरल्यास 40 टक्के सवलत व्याजात मिळणार असल्याचेही घोसाळकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे ही अभय योजना रहिवाशांना दिलासा देणारी ठरणार आहे.