मुंबई : केंद्र सरकारच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली आहे. याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सकाळी 6 वाजल्यापासून संप पुकारला आहे. तेव्हा आज राज्यात सकाळपासून राज्यातील ऍलोपॅथी डॉक्टरांचे दवाखाने, क्लिनिक आणि ओपीडी बंद आहे. मात्र, याचा राज्यातील रुग्णांना कोणताही फटका बसणार नाही. आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी हजर-तत्पर असल्याचे म्हणत आता 'आयुष' डॉक्टर पुढे आले आहेत.
आयुष डॉक्टरांनी आयएमए डॉक्टरांना जशाच तसे उत्तर देत आज आपले दवाखाने, क्लिनिक सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात आज सुमारे सव्वा दोन लाख आयुष डॉक्टर अधिक वेळ रुग्णसेवा देतील, अशी माहिती 'निमा'च्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) डॉ. संजय लोंढे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.
आयएमएचा आयुर्वेदिक शास्त्रक्रियेला विरोध..
एमएसचे शिक्षण घेणाऱ्या आयुष डॉक्टरांना आता यापुढे 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येणार आहेत. मात्र हा निर्णय म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे असे म्हणत आयएमएने याला विरोध केला आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे केंद्राचा कानाडोळा असल्याने आयएमएने आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज देशभरातील आयएमए डॉक्टर सकाळी 6 ते सायंकाळी 6 यावेळेत संपावर गेले आहेत. ही मागणी रद्द करून घेतल्याशिवाय माघार घेणार नाही यापुढे ही विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहील अशी माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
आयुष डॉक्टरही मैदानात..
शस्त्रक्रियेचा उगमच आयुर्वेदात झाला असून आयुष डॉक्टर योग्य ते शिक्षण घेऊनच शस्त्रक्रिया करणार आहेत. मग याला विरोध का? असे म्हणत आता आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टर एकवटले आहेत, त्यांनी आयएमए डॉक्टरांविरोधात दंड थोपटले आहेत. तर आयएमएच्या आजच्या संपाला उत्तर म्हणून आज आयुष डॉक्टरांकडून अधिक काळ रुग्णसेवा दिली जात आहे. सुमारे सव्वा दोन लाख डॉक्टर आज सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत काम करणार आहेत. त्यामुळे रुग्णांना याचा कोणताही त्रास होणार नाही असेही डॉ. लोंढे यांनी सांगितले.
हेही वाचा : आयुर्वेदिक शस्त्रक्रियांविरोधात 'आयएमए' आक्रमक! देशभरातील डॉक्टर आज संपावर..