मुंबई - मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू असताना त्याला विरोध करायला गेलेल्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी 29 जणांवर 353 सारखे कलम लावून त्यांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे होते. महाविकास आघाडीची सत्ता येताच नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर रविवारी आरेतील 29 जणांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का दिला.
हेही वाचा - ...तर पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागेल - नवाब मलिक
त्यानंतर आज(सोमवार) सकाळी अटक करण्यात आलेल्या तरुणांनी आरे मेट्रो कारशेड परिसरात एकत्र येत जल्लोष केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले.
आमची सत्ता आल्यावर आम्ही आरेतील एकही झाडं तोडू देणार नाही, आरेला जंगल घोषित करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसार त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून नवीन महाविकास आघाडी सरकारकडून पर्यावरणप्रेमींच्या पर्यावरणाबाबत अपेक्षाही वाढल्या आहेत.
गुन्हे मागे घेतल्यावर पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया -
आमच्यावर ज्या चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मागे घेतल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो. नवीन सरकार आरेला जंगल घोषित करतील, असा विश्वास असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कपिल अग्रवाल यांनी म्हटले.
हेही वाचा - ठाकरे-मुंडे संबंध पूर्वीपासून चांगले, मातोश्रीच्या संपर्कात सर्वच - अनिल परब
आमच्यावरील गुन्हे सरकारने मागे घेतले. यामुळे आम्ही निवांत झालोय. आरेतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, जे गुन्हेगार नव्हते. आता आम्हाला दिलासा वाटत असल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या सुवर्णा सावे यांनी सांगितले.
नवीन सरकारने पुढच्या काळात आरेला जंगल घोषित करावं. आरेतील झाडं वाचवण्यासाठी आम्ही जो संघर्ष केला हा त्याचा विजय आहे, असे मुंबई विद्यापीठात शिकत असलेले विजय कांबळे यांनी सांगितले.