मुंबई - राज्य विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी आलेल्या बंडखोर आमदारांना ( Aaditya Thackeray On Rebel MLA Protection ) अतिरेक्यांप्रमाणे सुरक्षा पुरवल्याचा खोचक टोला, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच, शिवसेनेला फसवले, मात्र आरे येथे कारशेड आणून मुंबईकरांना फसवू नका, असा चिमटा काढला. विधानभवनात ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी ( Rebel MLA Shivsena ) करून शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष असा मिळून शिंदे गट तयार केला होता. आता शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करत महाविकास आघाडीला सत्तेबाहेर केले आहे. आज विधानभवनात अध्यक्षपद निवडणूक घेण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) विधानभवनात उपस्थित होते.
हेही वाचा - शिवाजीराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी नाही..
विधानसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक - शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले. पहिल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक झाली. निवडणुकीला एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गेलेले ५० बंडखोर आमदार मुंबईत आले. दरम्यान, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आमदारांना विधानभवनात आणण्यात आले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर यावरून निशाणा साधला.
मुंबईकरांना फसवू नका - कसाबला एवढी सुरक्षा नव्हती, जेवढी आज बंडखोर आमदारांना होती. या गोष्टीचे वाईट वाटते. प्रसारमाध्यमांशी बोलण्याची मनाई करण्यासाठी दोरी बांधून मीडिया सेंटरचा मार्ग बंद केला आहे. नक्की का आणि कशासाठी केल आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच, आरे कारशेडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. शिवसेनेचा राग आरेवर काढू नका? त्याऐवजी कारशेडसाठी पहाडी आणि कांजूरमार्ग येथील पर्यायी जागेचा वापर करा. शिवसेनेला फसवले, मात्र मुंबईकरांना फसवू नका, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केला.
इतर राज्यात आमदारांना सील केले त्याचे काय? - विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय सील केल्याबाबत आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. शिवसेनेचे ते कार्यालय आहे. आम्ही ते बंद केले. मात्र, शिवसेनेच्या आमदारांना बाहेर राज्यात सील करून ठेवले त्याचे काय? असे शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरेंनी शालजोडे लगावले.