मुंबई - दक्षिण मुंबईतील वरळी येथील ॲट्रीया मॉलमधील रेस्टो बार टॅप येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेस्टो बार टॅप या रेस्टॉरंटमध्ये हिजाब घातलेल्या महिलांना प्रवेश नाकारल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे ही धक्कादायक घटना उजेडात आली.
भारतीय पेहरावाला बंदी -
दोन मिनिटांच्या क्लिपमध्ये रेस्टॉरंटचा कर्मचारी महिलेला असे सांगत आहे की, रेस्टॉरंटमध्ये साड्या नेसून येणाऱ्या महिलांना देखील आम्ही परवानगी देत नाही. पुढे हिजाब घातलेल्या महिलेचा मित्र असंही म्हणत आहे की, "रेस्टॉरंटमध्ये भारतीय पोशाखांना परवानगी नाही, भारतात भारतीय पेहराव घालायचा नाही.'' हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याच्या रेस्टॉरंटच्या या अटीबद्दल नेटिझन्सने असंतोष व्यक्त केला आहे.
एका यूजरने शेअर केला व्हिडीओ -
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सकिनामाईमून या युझरने लिहिले, "मला आश्चर्य वाटतेय की, असे मूर्ख निर्बंध अजूनही धर्मनिरपेक्ष समाजात अस्तित्वात आहेत. आज माझ्या मैत्रिणीला एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. कारण तिने रिडा नावाचा एक प्रकारचा हिजाब घातला होता आणि ते अयोग्य असल्यामुळे काढून टाकण्यास सांगण्यात आले. हे पूर्णत: अस्वीकार्य आहे. इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वरळीच्या ॲट्रिया मॉलमधील रेस्टो बार टॅपमध्ये महिलेला तिचा हिजाब काढण्यास सांगितले. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या मित्रांना सांगितलं की, तुम्ही महिलेला हिजाब काढण्यास सांगा. या धक्कादायक घटनेमुळे सोशल मीडियावर असंतोष उफाळून आला असून साडी नेसून येणाऱ्यास देखील बंदी असल्याचे रेस्टो कर्मचाऱ्याने म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.