मुंबई - लोकहितासाठी माझ्या हातात बेड्या पडल्या आहेत. मला याचा सार्थ अभिमान असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर मारामारी, दरोडा, अँट्रॉसिटी सारखे 9 गंभीर स्वरूपाचे अशा एकूण 32 गुन्ह्यांचा राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पाढा विधान परिषदेत वाचून दाखवला. सगळ्यांच्याच भुवया यावेळी उंचावल्या होत्या.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत 260 अन्वये कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. गेले तीन दिवस चर्चा जोरदार झाली. विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवत सरकारच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे काढले. गोपीचंद पडळकर यांनी देखील राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून गुन्हेगारी वाढल्याचे सांगितले. तसेच माझ्यावर देखील गुन्ह्यांची नोंद आहे. हे सगळे गुन्हे लोक हितासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी राजकीय गुन्हे दाखल असल्याचा दावा केला. सभागृहाची दिशाभूल करणाऱ्या पडळकर यांना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गुन्हे आणि त्याची पार्श्वभूमीवर वाचून दाखवत तोंडघशी पाडले.
ते म्हणाले की, पडळकर यांच्यावर मारामारी, दरोडा, अँट्रॉसिटी, सरकारी कामात हस्तक्षेप सारखे 9 गंभीर स्वरूपाचे असे एकूण 32 गुन्ह्यांची नोंद आहे. केवळ राज्यातच गुन्हे दाखल नाही तर शेजारच्या कर्नाटक राज्यातही गुन्हा दाखल आहे. परराज्यातील हा गुन्हा असल्यामुळे मला तो ऑन रेकॉर्ड सभागृहासमोर सांगता येणार नाही. त्यावर भाष्य करणे देखील बरोबर नव्हे. परंतु, आम्ही कर्नाटक सरकारकडून जरुर ती माहिती मागवू, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात सांगितले.
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज सरकारच्या वतीने विरोधकांच्या आरोपातील हवा काढून टाकली. तत्कालीन सरकार काळात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले होते. त्याप्रमाणात महाविकास आघाडी सरकार मध्ये गुन्ह्यांचा आलेख कमी आहे. मात्र सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद नागपूरमध्ये असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.