मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणूक काही महिन्यात होणार आहे. मुंबईमध्ये मराठी, गुजराती आणि उत्तर भारतीय मते निर्णायक आहेत. गुजराती आणि उत्तर भारतीय मते भाजपाला मिळतात. मराठी भाषिक मते मिळवण्यासाठी भाजपाने मराठी कट्टा हा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाद्वारे भाजपाने मराठी भाषिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यावर सुमारे ४० दिवस मंत्रिमंडळ विस्तार केला नव्हता. यामुळे सरकारवर टीका होत होती. टीका थांबवण्यासाठी काल मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या ९ तसेच भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
पालिका निवडणुकीत फटका - काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईमधून एकमेव मंत्री म्हणून भाजपचे मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे गट किंवा भाजपकडून एकाही मराठी भाषिकाला मंत्री म्हणून संधी देण्यात आलेली नाही. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक मतदार आहेत. त्यांना हे आवडलेले नाही. यामुळे येत्या पालिका निवडणुकीत याचा फटका भाजपाला बसेल असे पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनिल शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेचाच महापौर - मुंबईमधील मराठी व इतर भाषिक मतदार शिवसेनेशी जोडला आहे. यामुळे गेली २५ वर्षे पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईकरांना गरज पडेल तेव्हा शिवसेना धावून जाते. यामुळे मुंबईकर नागरिक पुन्हा एकदा शिवसेनेला संधी देऊन शिवसेनेचाच महापौर पालिकेवर बसवतील अशी प्रतिक्रिया माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - डॉ. पी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर; वाचा, कोण आहेत वरवरा राव