मुंबई - लॉकडाऊनमध्ये दुप्पट किमतीने विक्रीस आणलेली लाखोंची दारू आणि गुटखा मुलुंड पोलिसांनी जप्त करीत एकाला अटक केली आहे. संजीव गुप्ता ऊर्फ गुड्डू (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - मुंबईसाठी लसीचे 99 हजार डोस प्राप्त; लसीकरणाला सुरुवात
मुलुंड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांना मुलुंडच्या डँपिंग रोडवर असलेल्या सिद्धार्थ नगरमध्ये एक निर्माणाधिन इमारतीमध्ये अनधिकृतपणे दारू आणि गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या ठिकाणी दुप्पट किमतीने हवी तेवढी दारू, गुटखा आणि इतर व्यसनाचे साहित्य मिळत होते. याबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ सातचे प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (९ एप्रिल) रोजी रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पोरे आणि पथकाने या ठिकाणी प्रथम नकली ग्राहक पाठवून खात्री केली, माहिती खरी असल्याचे समजल्यावर तिथे धाड टाकली.
घटनास्थलावरून पोलिसांना तब्बल १३ प्रकारचा ३ लाख ३३ हजार किमतीचा गुटखा, ३१ हजार रुपयांची विविध कंपनीची दारू आढळून आली. पोलिसांनी सर्व माल ताब्यात घेतला आणि याची विक्री करणारा आरोपी गुड्डूला अटक केली. लॉकडाऊन असल्याने अशा प्रकारे मद्य आणि गुटखा दुप्पट किमतीला विक्री करून पैसे कमवण्यासाठी आरोपीने बंद पडलेल्या इमारतीच्या बांधकामाचा आसरा घेऊन हा धंदा सुरू केल्याचे पोलिसांनी उघड केले असून आरोपीबरोबर आणखी किती सहकारी आहेत? त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणत गुटखा आणि मद्य कुठून आणले? याचा पोलीस तपास करीत आहे.
हेही वाचा - आठवड्यासाठी लागणाऱ्या लसी द्या; आरोग्य मंत्री टोपे यांची केंद्राकडे मागणी