मुंबई - शुक्रवारी 5 दिवसाच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणरायाच्या विसर्जनासाठी पवई तलावावर भाविकांनी गर्दी केली होती. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची या आरतीच्या स्वरांनी पवई तलावाचा परिसर दुमदुमला होता. यादरम्यान गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी पवई तलावाकडे विक्रोळी, कांजूरमार्ग, हिरानंदानी, पार्क साईट ते सकिनाका, चांदीवली, संघर्ष नगर, मोरारजी नगर, एल ऍण्ड टी येथील गणेश भक्तांनी आपल्या कुटुंबासाहित तथा मंडळातील सदस्य ढोल ताशाच्या गजरात छोट्या मोठ्या वाहनातून तलावाकडे गर्दी झाली. गणेशभक्त आपल्या कुटुंबीयांसमवेत मोठ्या भक्तिभावाने पवई तलावावर येऊन गणेशमूर्तीची आरती केली. तसेच पालिका कर्मचारी व तलावातील कार्यरत स्वयंसेवकांकडून मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करण्यात आला. तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. तसेच पालिकेचे कर्मचारी, खाजगी स्वयंसेवक आणि एस एम शेट्टी महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थांनी सहकार्य केले. काही समाजसेवकही याठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे. पोलीस प्रशासनाने बॉम्ब शोधक पथक तसेच पवई तलाव येथे वाहतूक नियोजनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.