मुंबई - भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात त्यांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांताक्रुज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज यांनी सांताक्रुज पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, विद्या चव्हाण यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिलेल्या मुलाखतीत मोहित कंबोज असतील किंवा तुमचा तो किरीट सोमय्या असेल यांना गुजरातमध्ये पाठवून द्या. त्यांचे महाराष्ट्रात काही काम नाही अस चव्हाण म्हणाल्या आहेत.
मोदी सरकार काही करू शकते हे आम्हाला कळले आहे कंबोज यांनी गुजरातमध्ये जावे इथे चौकशा करू नयेत, गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या डायमंडचे व्यापार आहेत. लोकांचे धंदे आहेत, उद्योग आहेत त्यांची चौकशी करावी. आम्ही महाराष्ट्राचे लोक आहोत आमचे आम्ही बगू असही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, अगदी ईडीही माझ्यापर्यंत चौकशी करायला लावली तरी माझे काही म्हणणे नाही. कारण अत्यंत प्रामाणिक लोकांच्या चौकशी लागणे आणि गुन्हेगारांना तिकडे बसून मंत्रीपद देणे हे मोदी सरकारचे काम आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आता बिलकिश बानूच्या 11 बलात्कारांना सोडले. त्यामुळे मोदी सरकार काही करू शकते हे आम्हाला कळले आहे असही त्या म्हणाल्या आहेत.
काय आहे प्रकरण - काही दिवसांपासून भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याची चौकशी होणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी माजी आमदार आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांना ट्विटरवर विद्याताई जय श्रीराम असे म्हणत डिवचले आहे. त्यामुळे संतापलेल्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मोहित कंबोज हे ठग असून तो भारतीय जनता पक्षाचा मनी सप्लायर आहे, त्याने मला जय श्रीराम केले आहे तर, मी देखील त्याला हर हर महादेव जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली जय सियाराम असे म्हणत उत्तर दिले आहे. आम्ही प्रभू रामचंद्रांच्या आधी सितामय्याचे नाव घेतो, कारण आम्ही सच्चे हिंदू आहोत, आमचे हिंदुत्व ढोंगी नाही, त्यांचे हिंदुत्व ढोंगी आहे, असे म्हणत विद्या चव्हाण यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर पलटवार केला आहे.
फडणवीसांवर गंभीर आरोप मोहित कंबोज यांच्यावर टीका करताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, मोहित कंबोज माझ्या परिचयाचे नाहीत, मी त्यांना ओळखतही नाही. परंतु, एका निवडणुकीवेळी दिंडोशी आणि मालाडमध्ये असताना पोलिसांनी नोटांनी भरलेली बॅग पकडली होती, तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. परंतु, तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा फोन आला तेव्हा मला कळालं की ते भाजपचे नेते आहेत, तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळं ते वाचले असे म्हणत विद्या चव्हाणांनी कंबोज यांंच्यासह फडणवीसांवरही गंभीर आरोप केला आहे.
हेही वाचा - Congress Movement Against Inflation ४ सप्टेंबरला महागाईविरोधात रामलीला मैदानावर काँग्रेसचं आंदोलन