मुंबई - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोड सुरक्षा लावण्यात आलेली आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर एक फटाक्यांनी भरलेली चारचाकी गाडी आढळून आली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचा तपास मुंबई पोलीस करत आहेत, तर तपासादरम्यान ही गाडी याच भागातील एका नागरिकाची असून त्याचा फटाक्याचा व्यवसाय आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - विचार नाही केला तर व्यक्त कसे होणार? हायकोर्टाचा केंद्राला झटका, नव्या आयटी कायद्यातील 'या' नियमाला स्थगिती
स्वातंत्र्य दिनी मोठा घातपात घडवून आणण्याचा हा कट असावा, असा संशय आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, गाडीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली आहे.
सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर लाल रंगाची एक सुमो गाडी गेल्या चार-पाच दिवसांपासून उभी होती. त्यात मोठ्या प्रमाणात फटाके आढळून आले आहेत. स्वातंत्र्य दिनी कार्यालयात झेंडावंदन केले जाते, त्यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक तिरंग्याला सलामी देण्यासाठी येथे असतात, या फटाक्यांना आग लागली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता. अशाप्रकारे फटाक्यांनी भरलेली गाडी आढळल्याने मोठी खळबळ या भागामध्ये निर्माण झाली होती.
गाडी मालक कोण आहे ते कळाले
सुर्वे यांच्या कार्यालयाजवळ सापडलेल्या गाडीच्या मालकाचा तपास लागलेला आहे. या वाहन मालकाचे नाव बोबडे असे असल्याचे कळाले आहे. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आले आहे. मी फटाक्याचा व्यवसाय करतो, पावसामुळे फटाके वाहणात ठेवले, अशी प्राथमिक माहिती वाहन मालकाने पोलिसांना चौकशीच्या दरम्यान दिली आहे. मात्र, पोलीस सर्व बाजूने हे प्रकरण तपासत आहे.
हेही वाचा - मुंबईत बेकायदेशीर पार्किंग, वाहतूक कोंडीपासून मिळणार सुटका; पालिकेचे बहुमजली पार्किंग सुरू