मुंबई - कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याप्रमाणे २४ नोव्हेंबरपासून रेल्वे आणि विमानाने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. आतापर्यंत रेल्वेने आलेल्या २,१२,०१० प्रवाशांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात ८८ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर गेल्या ३ दिवसात विमानाने येणारे ६० प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
प्रवाशांच्या चाचण्या -
मुंबई, राज्यासह देशभरात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. धार्मिक सण आणि दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारने २४ नोव्हेंबरपासून दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. आज पासून ही चाचणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली आदी रेल्वे स्थानकावर सुरु करण्यात आली आहे.
या रेल्वे स्थानकावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर १३,२६६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे ६२,४२५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली त्यापैकी १८ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. दादर येथे १५३७७ प्रवाशांची तपासणी करण्यात आली त्यापैकी २६ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ८६०१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. वांद्रे स्थानकात ४३,६४० प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. तर बोरिवली येथे ६८७०१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. २४ नोव्हेंबरपासून आज ८ डिसेंबरपर्यंत रेल्वेने मुंबईत आलेल्या एकूण २,१२,०१० प्रवाशांची चाचणी करण्यात आली असून ८८ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
विमानतळावर ३ दिवसांत ६० प्रवाशांना कोरोना-
दिल्ली, गुजरात, राजस्थान व गोवा येथून मुंबईत विमानाने आलेल्या प्रवाशांची २४ नोव्हेंबर पासून विमानतळावरच चाचणी केली जात आहे. या चाचणी दरम्यान गेल्या ३ दिवसात तब्बल ६० प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विमानतळावर कोरोना चाचणीसाठी राज्य सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे १४०० रुपये घेतले जातात. ही रक्कम पुढील आठवड्यात आणखी कमी केली जाण्याची शक्यता आहे. विमानतळावर आधी एकाच काऊंटरवर कोरोना चाचणी केली जात होती. त्यात वाढ करून आता ६ काऊंटर करण्यात आले आहेत. आधी सबर्बन या एकाच लॅबकडून कोरोना चाचणी केली जात होती आता मेट्रोपोलीस लॅबलाही कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा- राज्यात ४ हजार २६ नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान, ५३ रुग्णांचा मृत्यू
हेही वाचा- सातारा: नेदरलँडची पॉली जेस्सी कोरोना पॉझिटिव्ह; पोलीस कर्मचारी होम क्वारंटाईन