मुंबई - महाराष्ट्रात मतदानाची धामधूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वरळी मतदार संघात सुमन जगन्नाथ भोसले या 83 वर्षीय आजींनी पतीसह मतदान केले. आज त्यांच्या लग्नाचा 55 वा वाढदिवस असून तो मतदान करून साजरा केला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मतदान होत असल्याने आनंद होत असल्याचे त्या म्हणाल्या.
या आजींनी आपल्या पतींसह 182 वरळी जांभोरी मैदान येथील मतदान केंद्रात मतदान केले. गेल्या 42 वर्षांपासून न चुकता मतदान करत असल्याचे त्यांनी सांगितले. लग्नाचा वाढदिवस आणि मतदान हे दोन्ही एकाच दिवशी आल्याने आज सकाळीच आजी नवी साडी, नाकात महाराष्ट्रीय पद्धतीची नथ असा पेहराव करून नटून-थटून मतदान केंद्रावर पोहोचल्या. त्यांनी पतींसह मतदान केले. तसेच, तरुणांनी आणि मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.