मुंबई - सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेला फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षांकरिता आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज आले. यातील आतापर्यंत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. मात्र, निवड झालेल्यापैकी पहिल्या फेरीत ३२ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी शाळेत तात्पुरती प्रवेश नोंदणी केली आहे. तर, १५ हजार २२१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
हेही वाचा - लहान मुलांच्या लसीकरणासाठी कंपन्यांचे ICMR ला पत्र, परवानगी मिळताच लहान मुलांचे लसीकरण
८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची झाली निवड
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लागलेले असते. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ९ हजार ४३१ शाळांमध्ये ९६ हजार ६२९ जागा आहेत. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांकरिता आरटीई प्रवेश प्रक्रियेची सोडत ३ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज आले आहेत. यातील आतापर्यंत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच, निवड झालेल्यांपैकी पहिल्या फेरीत ३२ हजार ३२२ विद्यार्थ्यांची शाळेत प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. तर, १५ हजार २२१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे.
सर्वाधिक पुण्यात विद्यार्थ्यांची निवड -
आरटीई अंतर्गत पुण्यातून सर्वाधिक १४ हजार ५६७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याखालोखाल ठाणे ९ हजार ८८, नागपूर ५ हजार ६११, नाशिक ४ हजार २०८ आणि मुंबईत ३ हजार ८२५ विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड झाली आहे. हे प्रवेश निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या फारच कमी आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्यांना आठवडाभरानंतर प्रवेशासाठी मेसेज पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.
कोणता जिल्हा, आणि किती आले अर्ज ?
अहमदनगर ४८२५, अकोला ४७०७, अमरावती ८९१८, औरंगाबाद ११८६१, भंडारा २०५१, बीड ३९३८, बुलडाणा ३४४५, चंद्रपूर ३०८२, धुळे १९४४, गडचिरोली ७३६, गोंदिया २३८०, हिंगोली ९८७, जळगाव ५९३९, जालना ३५८४, कोल्हापूर २६४५, लातूर ३९८९, मुंबई १२९११, नागपूर २४१६९, नांदेड ५३१८, नंदुरबार ५३६, नाशिक १३३३०, उस्मानाबाद १०९१, पालघर १६८२, परभणी १७८०, पुणे ५५८१३, रायगड ८००१, रत्नागिरी ८११, सांगली १४४६, सातारा २५००, सिंधुदुर्ग २४४, सोलापूर ४२५२, ठाणे १८९५६, वर्धा ३३०५, वाशीम १११९ आणि यवतमाळ ३३९३ असे आरटीई प्रवेशासाठी राज्य भरात २ लाख २२ हजार ५८४ अर्ज आले आहे.
आरटीईच्या १८ हजार ७७१ जागा कमी
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आरटीई प्रवेशासाठी राज्यभरतील ९ हजार ३३१ शाळांमधील १ लाख १५ हजार ४५५ जागांसाठी २ लाख ९१ हजार ३६८ अर्ज आले होते. मात्र, तेव्हा कोरोनामुळे त्यातील फक्त ५१ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले. तर, त्यातील ४० हजार ३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. मात्र, मागच्या वर्षीपेक्षा यंदाची कोरोना परिस्थिती समाधानकारक आणि नियंत्रणात आहे. तरीसुद्धा ऑनलाईन शिक्षणामुळे यंदा आरटीई प्रवेशाच्या जाग कमी केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ मध्ये १८ हजार ७७१ जागा कमी केल्या आहे. त्यामुळे, याचा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांना बसण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
हेही वाचा - Ganesh Utsav Guidelines : मूर्तीच्या उंचीपासून विसर्जनापर्यंतचे 'हे' आहेत नियम