मुंबई - कुर्ला परिसरात पुमा आणि इतर ब्रँडेड कंपनीचे बनावट शूज आणि सँडल विकणाऱ्या दुकानदारांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 34 लाख रुपयांचे ब्रँडेड कंपनीचे बनावट शूज आणि सँडला जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी राजेश गाडा, योगेश जैस्वाल, स्वप्नील कुंथले, बिनोद ब्रिजकीशन सिंग, अल्तामश शेख, साजिद हसन शेख, किशोर अहिरे, सचिन कानडे या आरोपीना अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरात हे शूज विकले जात होते. त्यानुसार पोलिसांनी दुकानावर छापा टाकून एकूण सहा जणांना बनावट शूजच्या मालासह अटक केली होती. त्यांच्याकडून एकूण 24 लाखांचे ब्रँडेड कंपनीचे बनावट शूज आणि सँडल पोलिसांनी हस्तगत केले होते. मात्र, त्यांच्या चौकशीमध्ये हे सगळे सँडल्स मस्जिद बंदर परिसरातून येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मस्जिद बंदर परिसरात असणाऱ्या दुकानातून दोघांना अटक केली आहे.
मस्जिद बंदर येथून अटक करण्यात आलेले दोनजण शूज आणि सँडल डिस्ट्रिब्युट करत होते. या प्रकरणी एकूण आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -
कांद्याचे दर घसरल्याने नाशिकमध्ये शेतकरी संतप्त; लिलाव अर्धा तास बंद