मुंबई - मुंबई शहर पोलीस दलातील कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई आणि छोटीसी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. या दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा वापर करण्यात येतो. ही योजना राज्य शासनाची नसल्याचा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केला आहे. ही योजना पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना आहे. यंदा मुंबई पोलिसांकरिता कार्यरत असलेल्या 6 पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी आवश्यक साहित्यावर 750 रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत मोडल्या जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून भरघोस दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही दिवाळी भेट देताना सरकारने मुंबई पोलिसांची मात्र चेष्टा केल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना काळात दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून कायदा व सुवस्थेचं काम पाहणाऱ्या मुंबई पोलिसांना सरकारने मात्र केवळ 750 रुपये दिवाळी भेट जाहीर केली आहे.
पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन,विविध अधिकारी कर्मचारी सत्कार,आरोग्यविषयक सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते. गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शुभेच्छा पत्र, मिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना येणा-या अडचणी टाळण्याच्या उददेशाने भेटवस्तूंऐवजी सदर रकमेचे थेट साहित्य खरेदी करण्याचा पर्याय सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे.
हे ही वाचा - Parambir Singh : परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, किल्ला कोर्टाकडूनही वॉरंट जारी
राज्यातील इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेची दिवाळी भेट जाहीर केली असताना पोलिसांना मात्र तुटपूंजी भेट जाहीर केल्याने पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरणं आहे. मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमधून त्याच्या नावे डेबिट व क्रेडिट कार्डवर 750 रुपये (प्रति कर्मचारी) इतक्या रकमेची खरेदी विनामूल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असलेल्या पोलीस कल्याण निधीतून दिली जाणार आहे.
ठरलेल्या रक्कमेच्या वरती खरेदी केल्यास ते पैसे त्यांना खिशातून द्यावे लागणार आहे. या संबंधीचे पत्र मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे काढण्यात आलं आहे. एकीकडे पालिका, बेस्ट कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना भरघोस दिवाळी बोनस दिला जात असताना पोलिसांना मात्र 750 रुपये दिवाळी भेट देऊन त्याची चेष्ठा केल्याची चर्चा पोलिस दलात आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना 20 हजारांची भेट -
मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मात्र गोड बातमी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका या दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देणार आहे. कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्ष 20 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना खुश करण्यात आले आहे.
सध्या मुंबई पालिकेत एक लाखांहून अधिक कर्मचारी आणि बेस्टचे 34 हजार कर्मचारी आहे. या निर्णयामुळे दिवाळी गोड होणार आहे. कोरोना संकटामुळे पालिकेलाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान कोरोना परिस्थिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे यंदाच्या दिवाळी पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला आहे.