मुंबई - तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या 'बार्ज पी305' व टग बोट वरप्रदा या दोन ठिकाणी भारतीय नौदलात तर्फे बचाव व शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत याठिकाणी करण्यात आलेला शोधकार्या दरम्यान एकूण 71 कर्मचाऱ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. यांपैकी आतापर्यंत 50 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. या मृतदेहांना संबंधित नातेवाईकांकडे देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. अजूनही 21 मृतदेहाची ओळख पटली नसून त्यासाठी त्यांची डीएनए चाचणी केली जात आहे.
वरप्रदावर शोधमोहीम सुरू; अद्याप एकही मृतदेह नाही आढळला..
भारतीय नौदलाच्या विशेष ड्रायव्हर्स पथकाकडून अरबी समुद्रातील टग बोट वरप्रदा ज्याठिकाणी बुडाली होती त्या ठिकाणी शोध मोहीम घेतली जात आहे. मुंबईपासून 35 नॉटिकल माईल्स वर समुद्रात टग बोट बुडाली असून नौदलाच्या 'आयएनएस मकर' व 'आयएनएस तरासा' या दोन जहाजांकडून विशेष डायव्हर्स पथकाकडून शोध मोहीम घेण्यात येत आहे. खोल समुद्रात सुरू असलेल्या या शोध मोहिमेत आतापर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आलेला नाहीये.
'बार्ज पी ३०५' वरील १८८ जणांना वाचवण्यात यश..
तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून अजूनही सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. बाकी लोकांपैकी ७१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. यातील 8 कर्मचाऱ्यांचे मृतदेह हे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी आढळून आलेले असून; आणखी 8 कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुजरातमधील वलसाड येथे मिळून आले आहेत. दरम्यान, बुडालेल्या बार्जवरील शोधमोहीम पूर्ण झाली असून याठिकाणी कोणताही मृतदेह आढळून आला नाही.
हेही वाचा : गोवा राज्यात स्मार्ट कामगार कार्ड सुविधेची सुरुवात, कामगारांना कार्ड घेण्याचं मुख्यमंत्र्यांचे आवाहन