मुंबई - शहरातील मालाड पूर्व भागात पोलिसांनी चोरी करणारी एक टोळी गजाआड केली आहे. विशेष म्हणजेही टोळी एकाच कुटुंहबातील सदस्यांची आहे. या कुटुंबातील सदस्य सराफा दुकानात जाऊन दागिन्यांची चोरी करत होते. या टोळीमध्ये १० जणांचा समावेश असून एकाच कुटुंबातील ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मुलासह आई, सून, सासू असा गोतावळा समाविष्ट आहे.
या टोळीने महाराष्ट्रासह तेलंगणा छत्तीसगड या राज्यातील सोन्याच्या दुकानात हात साफ केला असल्याची कबुली दिली आहे. १३ जानेवारीला याच टोळीने कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मयूर ज्वेलर्स या दुकानातून १० तोले सोने लंपास केले होते.
मयूर ज्वेलर्सच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या १३ तारखेला दुपारी २ वाजताच्या सुमारास काही लोक दुकानात आले होते. त्यावेळी ३ जण सोने खरेदी करून निघून गेले. मात्र, त्याच्यानंतर दुकान मालकाच्या लक्षात आले की १० तोळे सोन्याची चोरी झाली आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहुन चोरीच्या घटनेचा उलगडा लावला. तपासादरम्यान चोरांची ही टोळी पुण्यात वास्तव्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पुण्याच्या विविध भागातून ५ जणांना अटक केली.
५० पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल-
त्यामध्ये रेखा हेमराज वाणी (45 वर्ष), अक्षय हेमराज वाणी (19 वर्ष), शेखर हेमराज वाणी (28 साल), रेणुका शेखर वाणी (23 वर्ष), नरेंद्र अशोक साळुंखे (35 वर्ष) आणि कुर्लामधून कार चालक आशुतोष मिश्रा याला शनिवारी अटक करण्यात आली. या सर्व आरोपींवर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात ५० पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून १ लाख ९० हजार रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस सध्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत.