मुंबई - शासनाकडून मिळालेल्या निधीतून बेस्टच्या ताफ्यात 80 इलेक्ट्रिकल बसेस दाखल होणार आहेत. त्यात 40 एसी बसेसचा समावेश आहे. बेस्ट परिवहन विभागाला या बसेस प्रत्येकी 40 अशा दोन टप्प्यात उपलब्ध होतील. यातील पहिल्या 5 बस बेस्टकडे आल्या आहेत. आरटीओच्या प्रक्रियेनंतर या बस ऑगस्टपासूनच चालवण्याचा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे.
बेस्टच्या दिवसाला 3 हजार 100 फेऱ्या होतात. दिवसाला साधारणतः 30 लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. काही दिवसांपूर्वीच बेस्टने तिकीट भाड्यात कपात केल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. यामुळे बेस्टला नवीन बसेसची अत्यावश्यकता आहे. येत्या काही महिन्यांत बेस्टच्या ताफ्यात वेट लिसवरील (भाडे तत्त्वावरील) नवीन इलेक्ट्रिकल बसेस दाखल होणार आहेत. याव्यतिरिक्त बेस्टकडे 6 एसी बस व एमएमआरडीएच्या मालकी हक्क असलेल्या 25 हायब्रीड बस आहेत. आता बेस्टला 5 एसी बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित 35 बसेस लवकरच प्राप्त होतील. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच 'वेट लिस' बस घेण्यात येणार आहे. संबंधित कंत्राटदाराची या बसवर चालक नेमणे व त्याची देखभाल करण्याची जबाबदारी असणार आहे.