मुंबई - दक्षिण आफ्रिकेसह काही देशांत कोरोना विषाणूचा ओमायक्रोन या नवीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत मुंबई विमानतळावर आलेल्या 485 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग व एस जिन चाचण्या केल्या जाणार आहेत.
हेही वाचा - Omicron Variant : ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर बेडस, ऑक्सिजनसह मुंबई महापालिका सज्ज!
परदेशी प्रवाशांच्या चाचण्या -
ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने देशात येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या तसेच, त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबई विमानतळावर गेल्या १५ ते २० दिवसांत जे प्रवासी परदेशातून आले आहेत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या विभागवार असलेल्या वॉर रूममधून या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात असून, जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग व एस जिन चाचण्या केल्या जाणार आहेत.
९ प्रवासी कोरोना पोझिटिव्ह -
१० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान ४० देशांतून २ हजार ८६८ प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी ४८५ प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग तसेच, एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
पॉझिटिव्ह प्रवासी -
1. लंडन येथून 10.11.2021 ला आलेला 21 वर्षीय पुरुष
2. मोरीशियस येथून 25.11.2021 ला आलेला 47 वर्षीय पुरुष
3. साऊथ आफ्रिका येथून 25.11.2021 ला आलेला 39 वर्षीय पुरुष
4. लंडन येथून 1.12.2021 ला आलेला 25 वर्षीय पुरुष
5.लंडन येथून 17.11.2021 ला आलेला 66 वर्षीय पुरुष
6. पोर्तुगाल येथून 25.11.2021 ला आलेला 69 वर्षीय पुरुष
7. लंडन येथून 13.11.2021 ला आलेला 34 वर्षीय पुरुष
8. लंडन येथून 2.12.2021 ला आलेला 44 वर्षीय पुरुष
9. जर्मनी येथून 2.12.2021 ला आलेला 38 वर्षीय पुरुष
हेही वाचा - Jawad Cyclone Alert : राज्यातील 'या' जिल्ह्यांना बसू शकतो 'जवाद' चक्रीवादळाचा फटका!