मुंबई - कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असताना यातील बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील सुमारे ४७ टक्के खाटा रिक्त आहेत. रुग्ण संख्या वाढत असली तरी त्यांना सोयी व सुविधा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रुग्णसंख्येत वाढ -
मुंबईत २२ मार्चला कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख ६५ हजार ९१४ वर पोहचला आहे. मृतांचा आकडा ११ हजार ५९२ वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या ३ लाख २८ हजार ३१ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या २५ हजार ३७२ सक्रिय रुग्ण आहेत. २१ मार्चच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या ३ लाख ६२ हजार ६५४ रुग्णांची नोंद झाली. ११ हजार ५८२ रुग्णांचा मृत्यू झाला. ३ लाख २६ हजार ७०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २३ हजार ४४८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत २१ मार्चला ३७७५ तारा २२ मार्चला ३२६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची ही नोंद आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी मुंबईमधील रुग्णालये आणि कोरोना सेंटरमधील खाटा रिक्त आहेत.
४७ टक्क्यांहून अधिक खाटा रिकाम्या -
मुंबईत रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून डिसीएचसी व सीसीसी २ जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या कोविड सेंटरमध्ये १३ हजार ५१४ खाटा आहेत. त्यापैकी ७,१८३ खाटांवर रुग्ण आहेत. तर ६,३३१ खाटा म्हणजेच ४७ टक्के खाटा रिक्त आहेत. कोविड सेंटरमधील डिसीएचसी या प्रकारात गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी ५,२८६ खाटा आहेत. त्यापैकी २,५४८ म्हणजेच ४८ टक्के खाटा रिक्त आहेत. तर २७३८ म्हणजेच ५२ टक्के खाटांवर रुग्ण आहेत. डिसीएचमध्ये गंभीर आजार नसलेल्या रुग्णांसाठी ७४०८ पैकी ३,३६८ म्हणजेच ४५ टक्के खाटा रिक्त आहेत. त्यातील ४,०४० म्हणजेच ५५ टक्के खाटांवर रुग्ण आहेत. तर सीसीसी 2 मध्ये ८२० पैकी ४१५ म्हणजेच ५१ टक्के खाटा रिक्त आहेत तर ४०५ म्हणजेच ४९ टक्के खाटा भरलेल्या आहेत.
हेही वाचा - पैसे मोजायचे मशिन, फाईव्ह स्टार हॉटेलची राहणी, आता सापडली गोपनीय डायरी
रुग्णालयातील खाटा रिक्त -
पालिका सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये १२ हजार ६९४ खाटा आहेत. त्यापैकी ६,७७८ खाटांवर रुग्ण आहेत. तर ५,९१६ खाटा रिक्त आहेत. १ ५३९ आयसीयू खाटा आहेत. त्यावर ९५२ रुग्ण आहेत. तर ५८७ आयसीयूच्या खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या ८,६४१ खाटा आहेत. त्यावर ४०८७ रुग्ण असून ४,३७४ खाटा रिक्त आहेत. ९६६ व्हेंटिलेटर असून ६५७ रुग्ण आहेत. तर ३०९ व्हेंटिलेटर रिक्त आहेत.
या ठिकाणी रुग्णांवर उपचार -
मुंबईमधील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क लोकांसाठी हॉटेल, लॉज, शाळा यामध्ये सीसीसी १ प्रकारचे कोरोना सेंटर सुरु आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सीसीसी २ कोरोना सेंटर सुरु आहेत. शहरात बीकेसी, मुलुंड, वरळी, नेस्को, दहिसर आदी ठिकाणी जंबो कोविड सेंटर सुरु आहेत. तसेच महापालिकेने आपल्या रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - कर्जफेडीवरील मुदतवाढीला ३१ ऑगस्ट २०२० पेक्षा जास्त वाढ नाही -सर्वोच्च न्यायालय
खाटा राखीव ठेवायला विरोध -
रुग्ण वाढत असल्याने खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याला नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने विरोध दर्शवला आहे. नायर रुग्णालय हे केवळ पालिकेचे रुग्णालय नसून वैद्यकीय महाविद्यालयही आहे. करोनासाठी खाटा राखीव करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका. पालिकेच्या इतर मुख्य रुग्णालयांप्रमाणे काही भाग करोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांसाठी खुला ठेवण्याची मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पालिकेकडे केली आहे. यावर आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णनिवडीचा पर्याय राहत नाही. टप्प्याटप्प्याने नायर रुग्णालयात करोनाबाधितांसाठीच्या खाटा वाढविण्यात येतील असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
म्हणून रुग्णालयांमध्ये खाटा रिक्त
मुंबईत सध्या रुग्ण संख्या वाढत असली तरी त्यात 97 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. या रुग्णांच्या घरात वेगळे शौचालय आणि खोली असल्यास त्यांना घरीच क्वारंटाईन केले जाते. घरी सुविधा नसलेल्या रुग्णांना कोविड सेंटर किंवा इतर आजार असल्यास जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते. जे रुग्ण कोरोना नियमांचे पालन करत नाहीत, त्यांनाही कोरोना सेंटरमध्ये भरती केले जाते. सध्याच्या परिस्थितीत लक्षणे नसलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील खाटा रिक्त आहेत. गरज पडल्यास पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक अशी 24 कोरोना सेंटर उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - शरद पवारांचा अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा डाव फसला - देवेंद्र फडणवीस