मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने मालाड पश्चिममधून 24 किलो तर बोरिवली पूर्वमधून 23 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बोरिवलीमधून 23 किलो गांजा जप्त
बोरिवली पूर्वमध्ये गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान बोरिवलीच्या नॅशनल पार्क परिसरात एक व्यक्ती संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 23 किलो गांजा सापडला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 4 लाख 60 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून, गदाधर नित्यानंद पांडा (वय 42) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालाडमधून 24 किलो गांजा जप्त
मालाड पश्चिममध्ये एक महिला संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तीची झडती घेतली असता, तीच्याकडे 24 किलो गांजा सापडला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 4 लाख 80 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, शाहिदा मोहम्मद हैदर शेख ( वय 30) असे या महिलेचे नाव आहे.