मुंबई - रस्त्यावरील उघड्या गटारीमुळे चार जणांचा बळी गेला आहे. विक्रोळीत उघड्या गटारात ट्रकचे चाक अडकून ट्रक उलटला. या अपघातात रस्त्याच्याकडेला थांबलेले पाचजण चिरडले गेले. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री विक्रोळी पार्कसाईट येथे घडली.
अश्विन हेबारे, विशाल शेलार, चंद्रशेखर मुसळे, हमीद शेख अशी मुत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी राजावाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक हा विक्रोळीतून धान्य घेऊन जात होता. यावेळी ट्रकचे मागील चाक गटारात अडकले आणि ट्रक उलटला. रस्त्याच्याकडेला पाच जण तेथे उभे होते. हे पाचही जण पलटी झालेल्या ट्रकखाली चिरडले गेले. या अपघातात चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. पार्कसाईट पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली.