मुंबई - आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती आहे. राज्यात प्रतिवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मात्र कोरोना महामारीच्या सावटाखाली काही निर्बंध आणि नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करावी लागणार आहे. राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध लागू केले आहेत. त्या निर्णयावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी स्वागतही केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे आज शिवनेरी गडावर-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी गडावर जाऊन जन्मोत्सव साजरा करणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरी गडावर शिवरायांच्या जन्मस्थळी उपस्थिती लावून अभिवादन करतील. तसचे पर्यटन विभागाकडून करण्यात आलेल्या विकासकामाचाही ते यावेळी आढावा घेतील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असे सरकारनं सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केले आहे.
शिवजयंती नियमावली-
अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी इतर किल्ल्यांवर जाऊन १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.