मुंबई - शहरातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या ग्रान्ट रोड परिसरातील मोठ्या नवजीवन सोसायटीत तब्बल 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
ग्रान्ट रोड परिसरात सर्वात मोठी रहिवासी आणि व्यवसायिक सोसायटी म्हणून नवजीवन हौसिंग सोसायटीला ओळखले जाते. या सोसायटीत 14 इमारती आणि त्यात 736 हुन अधिक सदनिका आहेत. तर 266 हुन अधिक व्यावसायिक गाळे या सोसायटीत आहेत. जवळपास 10 हजार नागरिक या ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आलीय.
या सोसायटीत तब्बल 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल महापालिकेकडे उपलब्ध झाला आहे. या अहवालामुळे या परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली असून महापालिका, स्थानिक पोलीस यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. नवजीवन सोसायटीतील अहवाल आल्यानंतर महापालिका, आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून संपूर्ण इमारत सील करण्यात आली. तर दुसरीकडे स्थानिक पोलिसांकडून याठिकाणी नागरिकांना खबरदारी घेण्यासाठी वेगवेगळ्या सूचना देण्यात येत आहेत.
मुंबईत झोपडपट्टी आणि इतर वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मात्र आता उच्चभ्रू वस्त्यांमध्ये महामारी पसरण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, सध्या शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 64 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच सरासरी दर आणखी कमी होऊन आता 1.09 टक्के इतका झाला आहे.