मुंबई - ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला रोखण्यात अखेर सरकारला यश येताना दिसत आहे. एकीकडे ब्रिटन आणि युरोपमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याच्या धोरणामुळे नव्या स्ट्रेनचा प्रसार रोखण्यात यश आले आहे. त्यामुळेच आतापर्यंत 3730 प्रवाशांपैकी केवळ 77 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील 11 रुग्ण नव्या स्ट्रेनचे आहेत. दुसरीकडे या 11 पैकी 3 रुग्ण आतापर्यंत ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आता आणखी 2 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना ही लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
3630 प्रवाशांची कोरोना चाचणी -
22 डिसेंबरपासून ब्रिटिन आणि युरोपमधील प्रवाशांना विमानतळावरूनच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात येत आहे. याचा खूप मोठा फायदा झाला असून संक्रमण रोखण्यासाठी हे धोरण उपयोगी ठरले आहे. दरम्यान 22 डिसेंबरपासून आतापर्यंत 4933 रुग्णांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील 2688 प्रवासी 28 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्याचवेळी 4933 प्रवाशांमधील 3630 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 77 रुग्ण पॉझिटिव्ह -
3630 प्रवाशांच्या कोरोना चाचणीच्या अहवालापैकी 77 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात मुंबईतील 32, पुण्यातील 17, ठाण्यातील 8, नागपूरमधील 9, नाशिक, औरंगाबाद, रायगड, बुलढाणा प्रत्येकी 2 तर अमरावती, उस्मानाबाद, नांदेड, वाशीममधील प्रत्येकी 1 असे हे रुग्ण आहेत. या 77 रुग्णांपैकी 76 रुग्णांचे नमुने एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) पुणे यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. एक नमुना लवकरच पाठवण्यात येणार आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आलेल्याच्या संपर्कातील 536 जणांचा शोध घेण्यात आला आहे. यातील 364 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातून 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईतल्या दोघांना तर पुण्यात एकाला डिस्चार्ज -
नव्या स्ट्रेनचे जे 11 रुग्ण आढळले आहेत यातील 3 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या आणि 14 दिवस पूर्ण झालेल्या या तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील दोघे मुंबईतले तर एक जण पुण्यातील आहे. ही दिलासादायक बाब असताना आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे आज आणखी 2 जण कोरोना मुक्त झाले असून त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 7 जानेवारीपासून नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण वाढलेला नाही.