मुंबई - राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर २०२१ या तीन महिन्याचा घरभाडे भत्त्याचा फरक तातडीने द्यावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे याबाबत अनिल बोरनारे यांनी वित्तमंत्री अजित पवार व वित्त विभागाचे सचिवांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
टॅब कार्यान्वित करून घरभाडे भत्ता द्यावा ! - वित्त विभागाच्या ७ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता माहे जुलै २०२१ पासून १७ टक्के वरून २८ टक्के करण्यात आला आहे. ज्याचा लाभ सर्व राज्य सरकारी कर्मचारी व इतर अनुदानित कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. वित्त विभाग शासन आदेश ५ फेबुवारी २०१९ नुसार महागाई भत्ता २४ टक्के पार करून गेल्यावर घरभाडे भत्ता २४ टक्यांवरून २७ टक्के करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार माहे ऑक्टोबर २०२१ पासून २७ टक्के प्रमाणे घरभाडे भत्ता लाभ देण्यात आला आहे.परंतु अद्याप जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या तीन महिन्यांचा फरक देण्यात आलेला नाही. वेतन पथक स्तरावर महागाई भत्ता फरक घरभाडे फरक टॅब (HRA Arrears Tab) उपलब्ध नसल्याने हा फरक देता येत नाही.तरी त्वरित हा टॅब कार्यान्वित करून घरभाडे भत्ता त्वरित कर्मचाऱ्यांना मिळावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांची वित्तमंत्र्यांकडे केली आहे.
वाहतूक भत्ताही द्यावा - शासनाच्या २० एप्रिल च्या आदेशानुसार वाहतूक भत्त्यात माहे एप्रिल २०२२ पासून वाढ करण्यात आली आहे. सदर वाढ माहे मे २०२२ च्या वेतन देयकात माहे एप्रिल २०२२च्या फरक रकमेसह मिळावी अशीही मागणी या निवेदनात केली असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिली आहे.