मुंबई - कोरोना काळात मुंबईमध्ये रेल्वे सेवा बंद असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट धावून आली. कोरोनाचा प्रसार कमी होताच सामान्य प्रवाशांनाही बेस्टने परिवहन सेवा उपलब्ध करून दिली. कोरोनाच्या काळात गेली दीड वर्षे बेस्टचे कर्मचारी मुंबईकरांसाठी आपल्या जिवाची परवा न करता काम करत आहेत. या कालावधीत सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २७ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद संशयित कोविड मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. यामुळे या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्याप नोकरी व इतर आर्थिक मदत मिळाली नसल्याने गेले वर्षभर त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट सुरू आहे.
हेही वाचा - नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे - फ्लेचर पटेल
२७ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट -
बसमधून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सामान्य प्रवासी यांना कोरोना काळातही सेवा देताना बेस्टमधील परिवहन आणि विद्युत विभागातील एकूण ३३ हजार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ३ हजार ५६१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये १५० कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामधील २७ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद संशयित कोविड मृत्यू म्हणून करण्यात आल्याने त्यांच्या वारसांना बेस्टकडून नोकरी देण्यात आलेली नाही. गेले एक वर्ष या मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय बेस्ट कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र, त्यांना अद्याप अनुकंपा नोकरी मिळाली नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. कोविडमुळे मृत्यू झाल्याने मिळणारी ५० लाखाची रक्कमही त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेली नसल्याची माहिती बेस्ट समितीमधील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली. पालिका आणि बेस्टच्या आरोग्य विभागाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी गणाचार्य यांनी केली.
मुंबईकरांसाठी बेस्ट आली धावून
११ मार्च २०२० ला मुंबईत पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्याने देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊन लावल्याने मुंबईमधील लोकल ट्रेन सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईमध्ये काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी घरातून कामाच्या ठिकाणी जायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने पुढाकार घेत बेस्ट बसेस रस्त्यावर उतरवल्या होत्या. मुंबईत रुग्णसंख्या कमी झाल्यावर बसमधून सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. आजही लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी असल्याने बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या बेस्टमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
७२ कोटींचा कोविड भत्ता थकला -
कोविड काळात पालिका कर्मचाऱ्यांना दिवसाला ३०० रुपये भत्ता देण्यात आला. असाच भत्ता बेस्ट कर्मचाऱ्यांनाही देण्याचे मान्य करण्यात आले. मुंबई महापालिकेकडून बेस्ट उपक्रमाला या भत्त्यासाठी ७२ कोटींची रक्कम दिली जाणार होती, मात्र ही रक्कम देण्यात आली नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्यात आलेला नाही, असे गणाचार्य म्हणाले.
बेस्टचे प्रयत्न सुरूच -
कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यासाठी पालिकेने ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर, अजूनही काही प्रलंबित प्रकरणात मदत करण्यासाठी पालिकेने संबंधित समितीकडे काही प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. असे 'बेस्ट' समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी सांगितले. तर, कोरोनामुळे जीव गमावलेल्या ९७ 'कोविड योद्ध्या' कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बेस्ट प्रशासनाने ५० लाखांची आर्थिक मदत केली आहे. तर, ७८ जणांच्या वारसांना नोकरी देण्यात आली असल्याची माहिती 'बेस्ट' महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
हेही वाचा - महापालिका सफाई कामगारांच्या घरांमध्ये १८४४ कोटी रुपयांचा घोटाळा - भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे