मुंबई - प्रवास करीत असताना काही मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी प्रवासी रेल्वे रुळ ओलांडताना. मात्र, रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. २०१९ पासून आतापर्यत मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर २ हजार ६७५ जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे हे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे पादचारी पुल उभारण्यावर भर देण्यात आला आहे. एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वेवर पाच तर मध्य रेल्वेवर चार पादचारी पुल उभारले आहेत. मध्य रेल्वेवरील चार पुलांचे काम सुरु असून ते डिसेंबरपर्यत पुर्ण हाेणार आहेत.
अपघातांना आळा बसणार -
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य व पश्चिम रेल्वेने हे प्रकार रोखण्यासाठी रुळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले. मात्र तरीही गेल्या काही वर्षांमध्ये हे अपघात कमी झालेले नाहीत. त्यामुळे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पुल उभारण्यावर भर देण्यात आला आहे. एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वेवर पाच तर मध्य रेल्वेवर चार पादचारी पुल उभारले आहेत. मध्य रेल्वेवरील चार पुलांचे काम सुरु असून ते डिसेंबरपर्यत पुर्ण हाेणार आहेत. यामुळे रेल्वे रुळ ओलांडताना हाेणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे.
२५ पादचारी पूल उभारण्याचा निर्णय -
रेल्वेच्या दोन स्थानकादरम्यान पादचारी पूल,पादचारी मार्गिका, भुयारी मार्ग उपलब्ध करण्याचे नियोजन केले. यासाठी एमयुटीपी-३ अंतर्गंत एमआरव्हीसीने एकूण २५ पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. यात मध्य रेल्वेनेही पूल उभारणीसाठी मदत केली. दोन स्थानकादरम्यान प्रथम बारा ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. यात पश्चिम रेल्वेवरील माहिम ते माटुंगा, वांद्रे ते खार, विलेपार्ले ते अंधेरी, जोगेश्वारी ते गोरेगाव, वसई ते नालासोपारा दरम्यान पूल उभारले आहेत. तर मध्य रेल्वेवरील कळवा ते मुंब्रा, दिवा जक्शन जवळ, दिवा ते दातिवली, अंबरनाथ स्थानकाजवळ, खांदेश्वर आणि सीवूड ते बेलापूर दरम्यान पुलांची कामे पूर्ण झाली आहेत.
२ हजार ६७५ जणांचा मृत्यू -
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ पासून आतापर्यत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ ओलांडताना २ हजार ६७५ जणांचा मृत्यू झालेला आहे. २०१९ मध्ये रेल्वे रूळ ओलांडताना उपनगरीय रेल्वेवर १ हजार ४५५ जणांचा मृत्यू आणि २७६ जखमी झाले होते. तर २०२० मध्ये ७३० जणांचा मृत्यू आणि १२९ जखमी आणि चालू वर्षात ४९० प्रवाशांच्या मृत्यू झालेला आहे. दररोज किमान ९ ते १० अपघात होतात.यामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडण्यापासून परावृत्त करण्यासाठी रेल्वेने पादचारी पुल, सरकते जिने, लिफ्टची सोय उपब्ध करुन दिलेली आहे. रेल्वे रुळ ओलांडण्यापासून प्रवाशांना थांबविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर विविध ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेली आहे.