मुंबई: राज्यात लवकरच सेमी बुलेट ट्रेन धावणार असून (semi bullet train) या प्रकल्पासाठी २५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. (land acquisition for semi bullet train). ही ट्रेन नाशिक ते पुणे या 230 किलोमीटर मार्गावर धावणार आहे. या बुलेट ट्रेनचा वेग सव्वाशे किलोमीटर प्रति तास राहणार असून ती हे अंतर अवघ्या दोन तासात पार करणार आहे.(semi bullet train in maharashtra). २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्र्यांशी राज्य सरकार पाठपुरावा करीत असल्याचे महारेलचे वरिष्ठ अधिकारी दिलीप काशिद यांनी सांगितले.
राज्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा: राज्यात महारेलच्या माध्यमातून विविध प्रकल्प प्रस्तावित केले गेले आहेत तर काही प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात सुरूही झाले आहे. यातील नाशिक- पुणे सेमी बुलेट ट्रेन प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम जोरदार सुरू आहे तसेच शेतकऱ्यांशी चर्चा सुद्धा केली जात आहे. भूसंपादनाला काही शेतकरी विरोध करीत आहेत, मात्र भूसंपादनाचे काम २५ टक्के पूर्ण झाले आहे.
भूसंपादनाचा वेग वाढल्यास प्रकल्पाला गती: पुणे-नगर-नाशिक या मार्गावरील भूसंपादनाचे काम सध्या सुरू असले तरी त्यात अडथळे येत आहेत. भूसंपादनाला शेतकऱ्यांनी मदत केल्यास हे काम लवकर पूर्ण होईल. हा प्रकल्प १२०० दिवसांत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ठ आहे. मात्र, २५ टक्क्यांहून पुढे संपादनाचे काम जायला हवे, तरच हे शक्य होईल असेही काशिद म्हणाले.
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रकल्पाच्या पूर्तेतेसाठी मदत करण्याची विनंती केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पत्र पाठवून सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहेत.
१६ हजार कोटींचा आहे प्रकल्प: पुणे नाशिक सेमी बुलेट ट्रेन प्रकल्प हा सुमारे 16039 कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्याकडून प्रत्येकी 50 टक्के गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्राकडून 20% प्रत्यक्ष गुंतवणूक तर राज्याकडून 20% प्रत्यक्ष गुंतवणूक आणि 60% कर्जाच्या माध्यमातून पैसे उभारले जाणार असल्याचेही काशीद यांनी सांगितले.
शेतकरी व स्थानिक नागरिकांना प्रकल्पाचे फायदे:
1) या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना शेजारील भागात आपली उत्पादने विकण्यासाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. कृषी बाजार समितीत पोहोचण्यासाठी त्यांच्यासाठी हा वेगवान आणि सोपा पर्याय असणार आहे.
2) सेमी हायस्कूल रेल्वेमुळे प्रवासी आणि मालवाहतूक जलद गतीने होणार आहे.
3) पुणे आणि नाशिक या दोन मोठ्या शहरांशी थेट कमी वेळेत संपर्क साधता येणार आहे, यामुळे रोजगाराच्या संधीचा विस्तार होउन ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी पुणे नाशिक येथे स्थलांतर होण्याची गरज भासणार नाही.
4) ही रेल्वे लाईन पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट संपर्क साधता येणार आहे त्यामुळे कृषी आणि इतर मालवाहू उत्पादने थेट कार्गो टर्मिनल द्वारे पाठविले जाऊ शकतात.
5) सिन्नर संगमनेर या भागात उत्पादित होणाऱ्या डाळिंब दूध आणि अन्य कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये 80 टक्के अन्नधान्य वाहतुकीस वाढ होण्याची शक्यता असून गोदाम आणि शीतगृहाची सुविधा आवश्यकतेनुसार स्थानकांवर विकसित होणार आहे.
6) या प्रकल्पामुळे प्रकल्प प्रभावी क्षेत्रामध्ये जमिनीच्या दरात वाढ होणार आहे. रोजगाराच्या दरात वाढ झाल्याने व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर आवश्यक सेवांचा सर्वांगीण विकास होईल असा दावाही काशीद यांनी केला आहे.
कोणती असतील स्थानके? : महारेल द्वारे या मार्गावर नियोजित रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये पुणे, हडपसर, मांजरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव भोरवाडी, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकुर, अंभोरे, संगमनेर देवठाण, चास, दोढई, सिन्नर, मोहदारी, शिंदे, आणि नाशिक रोड मार्गावर ही रेल्वे धावणार असल्याची माहिती काशिद यांनी दिली.