मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. शनिवारी मुंबईत कोरोनाच्या 2 हजार 402 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 46 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (शनिवारी) कोरोनाचे 2 हजार 402 नवे रुग्ण आढळून आले असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 40 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष तर 16 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 12 हजार 336 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 057 वर पोहचला आहे. मुंबईमधून दिवसभरात 1 हजार 634 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा एकुण आकडा 1 लाख 73 हजार 670 वर गेला आहे. सध्या मुंबईत 29 हजार 191 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 64 दिवस तर सरासरी दर 1.09 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 674 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 280 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 11 लाख 57 हजार 039 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.