मुंबई - मुंबईत कालच मुसळधार पावसामुळे वाशी नाका, विक्रोळी सूर्या नगर, मुलुंड आदी ठिकाणी घरे आणि दरड कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दरडखाली आपला जीव मुठीत घेऊन 22 हजार 483 झोपड्यांमध्ये लाखो लोक राहत आहेत. गेल्या 29 वर्षात दरड कोसळून 290 लोकांचा मृत्यू झाला असून 300 लोक जखमी झाले आहेत. दरड कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. तर याबाबत अधिकार नसल्याने हतबल असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
दरडखाली 22 हजार 483 झोपड्या -
मुंबईतील 36 पैकी 25 विधानसभा मतदारसंघात 257 ठिकाण डोंगराळ भागात धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, या भागातील 22 हजार 483 झोपड्यांपैकी 9 हजार 657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळ्यात भूस्खलनामुळे 327 ठिकाणाबाबत अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला आधीच सतर्क केले होते.
'सरकारकडून अॅक्शन टेकिंग प्लॅन तयार नाही'
1992 ते 2021 या दरम्यान दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 290 लोकांनी जीव गमावला असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते. मंडळाच्या अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दहा वर्षे उलटून गेले तरी नगरविकास विभागाने त्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणतीही अॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलाच नाही, असे गलगली यांनी सांगितले.
भौगोलिक स्थितीचा अभ्यास -
डोंगर उताराखाली हजारोच्या संख्येने झोपडपट्ट्या वसल्या आहेत. मुसळधार पावसात येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी पालिकेने जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. धोकादायक आढळलेल्या ठिकाणी 2006 ते 2016 या काळात पडलेल्या पावसाचे प्रमाण, अतिवृष्टीत निर्माण झालेली स्थिती यांचा अभ्यास तसेच डोंगर उतारावर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या जमिनीची प्रत, जमिनीच्या उताराची मजबुती, संबंधित जमिनीवर असलेल्या दगड-खडकांचे प्रमाण, भेगा यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार मुलुंड, जोगेश्वरी आणि चेंबूर, भांडूप, विक्रोळी पार्क साइट, घाटकोपर, कुर्ला आदी ठिकाणी डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांना जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणात 132 ठिकाणी अत्यंत कमी धोका, 40 ठिकाणी कमी ते मध्यम, 40 ठिकाणी मध्यम ते जास्त, 25 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा धोका, 62 ठिकाणी कोणताही धोका नाही, तर 45 ठिकाणे धोकादायक तर 20 ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे. मुलुंड, जोगेश्वरी आणि चेंबूर, भांडूप, विक्रोळी पार्क साइट, घाटकोपर, कुर्ला आदी ठिकाणी डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांना जास्त धोका असल्याचे म्हटले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश संबंधित यंत्रणांना मागील वर्षी (मे 2020) दिले आहेत.
महापालिका हतबल -
मुंबईत दरडखाली 22 हजार 483 झोपड्या आहेत. दरडखाली असलेल्या झोपड्या जिल्हाधिकारी तसेच वन विभागाच्या जमिनीवर आहेत. पालिका अशा विभागात जनजागृती करते. या झोपड्यांना पावसाळ्याच्या सुरुवातीला पालिकेकडून धोक्याचा इशारा देण्यात येतो. मात्र या झोपड्या स्थलांतरित करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी तसेच वन विभागाला करावी लागते. त्याठिकाणी पालिकेला कारवाई करता येत नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली आहे.
दरवर्षी केले जाते पालिकेकडून आवाहन -
पावसाळा दरम्यान जोराच्या पावसाने दरड कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे, जोरदार पावसाने नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता असल्याने रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महापालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे महापालिकेकडून कळविले जाते.
'या' ठिकाणी दरडखाली झोपड्या -
मलबार हिल, परेल, अँटॉप हिल, घाटकोपरमध्ये असल्फा खंडोबा टेकडी सूर्या नगर, मुलुंड हनुमान टेकडी, चेंबूर- वाशीनाका, भांडुपमध्ये केतकी पाडा खिडी पाडा, कुर्ला कसाईवाडा, चेंबूर वाशी नाका, मालाड, दिंडोशी, कांदिवली आदी 257 ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडखाली झोपड्या आहेत.