मुंबई - एनसीबीकडून बॉलिवूड व सेलिब्रिटींवर कारवाईचा धडाका सुरू असताना मुंबई पोलिसांनीही धडक कारवाई सुरू केली आहे. आज सायन परिसरातून एका महिला ड्रग्ज तस्करला तब्बल 22 कोटी रुपये किंमतीच्या हेरॉइनसह गजाआड करण्यात आले आहे. मागील वर्षापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (NCB) ड्रग्ज पेडलर विरोधात धडक मोहीम सुरू आहे. मुंबईत ठिकठिकाणी छापा टाकून एनसीबी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सायन परिसरात काल, मंगळवारी रात्री मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सायनमधून तब्बल 22 कोटींची हेरॉईन जप्त केली असून यामध्ये एका महिला ड्रग्ज पेडलरला गजाआड करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांची कामगिरी -
राजस्थान, प्रतापगड परिसरातून देशभरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पाठवले जातात. मुंबईत देखील तब्बल 7 किलो हेरॉइन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी (दि.19) रोजी रात्री मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी घाटकोपर पथकाने सायन परिसरात छापा टाकला. यावेळी सायन परिसरातून ड्रग्ज पेडलर महिलेकडून 7 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. ज्याची किंमत जवळपास 22 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पथकाने ही कारवाई केली आहे. यासंदर्भातील मुंबई पोलिसांकडून आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मोठी कारवाई -
दरम्यान 2 ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने मुंबईहून गोव्या जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक जणांना अटक करण्यात आली. आज याप्रकरणातील अटकेत असलेल्या आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान जेलमध्ये आहे. त्यामुळे आज आर्यन खानला बेल मिळणार की पुन्हा जेल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. मुंबई पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने चालू वर्षात पहिल्या आठ महिन्यांत ३ हजार ५७५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ८७ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. अमली पदार्थ तस्करीची साखळी तोडण्यासाठी ड्रग्ज पुरवठादारांपासून ते व्यसन करण्यापर्यंतच्या आरोपींना पकडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये सर्वच प्रकारच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. कोकेन, हेरॉईन, चरस, एमडी, गांजा याचबरोबर एलसीडी डॉट्स, नशेच्या गोळ्या तसेच मोठ्या प्रमाणात कफ सिरपचा साठा देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा - Aryan Khan Bail Rejected : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला