मुंबई - मुंबईतल्या गोवंडी परिसरातून गेल्या 11 महिन्यांमध्ये 21 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. या बेपत्ता तरुणींची राज्य सरकार चौकशी करणार आहे का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे. तसेच या तरुणी नेमक्या गेल्या कुठे, हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण आहे का याचाही शोध घ्यावा असेही ते म्हणाले आहेत.
गेल्या 11 महिन्यांत गोवंडी परिसरातून 14 ते 30 वयोगटातील तब्बल 21 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गोवंडी परिसरातून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी थक्क करणारी आहे. 29 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या 12 दिवसांत 7 मुली बेपत्ता झाल्या आहेत. या मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही.
सरकार या बेपत्ता मुलींचा शोध घेणार का?
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून 'लव्ह जिहाद' आणि महिला अत्याचार राज्यात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. या दोन मुद्द्यावरून भाजपने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, आणि आता त्यातच गोवंडी परिसरातून गेल्या 11 महिन्यांमध्ये तब्बल 21 मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार या मुलींचा शोध घेणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी विचारला आहे. दरम्यान उद्या याबाबत सोमैया हे गोवंडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची भेट घेणार आहेत.