मुंबई - वरळी बीडीडी चाळीत गॅस सिलेंडर स्फोटात (Gas Cylinder blast in BDD Chawl) जखमी झालेल्या ४ जखमींवर उपचार करण्यात नायर रुग्णालयाने हलगर्जीपणा (Negligence in Nair Hospital) केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी २ डॉक्टर आणि एका नर्सचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असून प्राथमिक अहवाल येताच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. याप्रकरणी थर्ड पार्टी चौकशीही करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू -
वरळी बीडीडी चाळीत मंगळवारी सकाळी सिलेंडर स्फोट (Gas Cylinder blast in BDD Chawl) झाला. या स्फोटात एकाच कुटूंबातील चार जण भाजल्याने जखमी झाले. या जखमींना जवळच्या नायर रुग्णालयात (Nair Hospital) उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांकडून हलगर्जीपणा करण्यात आला. यामुळे चार पैकी तीन रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयातील भाजलेल्या रुग्णांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. त्याठिकाणी ४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकारचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नायर रुग्णालयाने चौकशी समिती नियुक्त केली आहे.
कठोर कारवाई केली जाणार -
नायर रुग्णालयामध्ये झालेला प्रकार हा चुकीचा आहे. यामुळे त्वरित २ डॉक्टर आणि एका नर्सला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. या समितीचा प्राथमिक अहवाल आल्यावर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायर रुग्णालयातील समितीचा अहवाल योग्य की अयोग्य हे तापसण्यासाठी थर्ड पार्टी चौकशी केली जाईल. यात एक पालिकेचा डॉक्टर तसेच दोन बाहेरील डॉक्टर असतील अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. पालिकेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना इमर्जन्सी तसेच इतर ठिकाणी रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर कसे वागावे कसे बोलावे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात माणुसकी ठेवून वागण्याचे व संवेदना जागृत ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
वेदनादायी, चिंताजनक निंदनीय प्रकार -
नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे; वरळीमधील बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्यावर तब्बल तासभर कोणताही उपचार न केल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला. या मृत बालकाच्या कुटुंबियांना २५ लाखांची आर्थिक मदत करावी. तसेच तसेच रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर आग्रीपाडा पोलिस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे. मुर्दाड प्रशासनाचे व सत्ताधार्यांचे हे वर्तन अत्यंत वेदनादायी, चिंताजनक आणि निंदनीय आहे अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी दिली.
नायर प्रकरणाची चौकशी होणार -
वरळी येथे गॅस सिलेंडर स्फोट झाला. त्यात एकाच कुटूंबातील चार जण भाजून जखमी झाले. या जखमींवर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे एका ४ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. यावर बोलताना भाजप आंदोलन करतंय, लोकशाहीतील तो त्यांचा अधिकार आहे. पण नायर मध्ये काय झालं ? त्याची चौकशी होणार. एवढे निर्दयी कोणी कसं वागु शकतो, कळतं नाही असे महापौर म्हणाल्या.
हेही वाचा - Pawar Support to Mamata - Fadnavis : काँग्रेसला बाजूला ठेवून मोट बांधण्यात ममतांना पवारांची साथ - फडणवीस