मुंबई - शहर पोलिसांच्या सायबर सेलने एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. संबंधित संशयित बारावी पास असून तो चार्टर्ड अकाउंट अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. मात्र, या अल्पवयीन आरोपीने एका नामांकित कॉफीशॉपचे अकाउंट हॅक करून त्यातील सर्व डेटा मिळवला आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
मित्र-मैत्रिणींसोबत 'एन्जॉय' करण्यासाठी केला गुन्हा
28 सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला एका नामांकित कॉफी शॉपच्या चालकाकडून तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार संबंधित कॉफी शॉपच्या अकाउंटमधील डेटा चोरण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने बनावट सिम कार्डचा वापर करून सोशल मीडियावर, युट्युब वरील व्हिडीओ पाहून कॉफी शॉपच्या अकाउंटमधून लॉगिन केले. यानंतर त्यानं कॉफी शॉपच्या गिफ्ट कार्डमधील जमा रक्कम दुसऱ्या गिफ्टमध्ये वळती केली.
तांत्रिक तपासा दरम्यान गुन्हा उघड
या संदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीने वापरलेली संगणकीय साधने, सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक बाबींचे सखोल विश्लेषण करून पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला बाल न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर 15 हजार रुपयांचे बंधपत्र व दोन वर्ष एनजीओच्या अधिपत्याखाली समुपदेशन घेण्याचे आदेश दिले आहेत.