मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाबाधित 1625 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1,966 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 1625 नवे रुग्ण आढळून आले असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 37 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 33 पुरुष तर 14 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 17 हजार 90 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 199 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1,966 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 81 हजार 485 वर गेला आहे. सध्या मुंबईत 23 हजार 976 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवस तर सरासरी दर 1.04 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 649 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 10 हजार 106 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 11 लाख 89 हजार 398 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.