मुंबई - शहरात गुरुवारी कोरोनाचे 1,540 नवीन रुग्ण आढळून आले असून, 97 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 53,985वर तर मृतांचा आकडा 1,952वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 24,209 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 27,824 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 1,540 रुग्ण आढळून आले आहेत. तर आज नोंद झालेल्या 97 जणांपैकी 54 रुग्णांचे मृत्यू गेल्या 24 तासात झाले असून, 43 मृत्यू 7 जून आधीचे आहेत. या 43 रुग्णांचे मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचा अहवाल काल आल्याने गुरुवारच्या आकडेवारीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबईमधील 97 मृतांपैकी 65 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 63 पुरुष आणि 34 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 10 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 53 जणांचे वय 60 वर्षावर तर 34 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. तसेच मुंबईमधून आज 516 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 24,209 वर पोहचला आहे.
हेही वाचा : सांगलीत कोरोनाचे द्विशतक, दहा नव्या रुग्णांची नोंद