मुंबई - शहरातील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आय. सी. कॉलनीत गेल्या 48 तासात चोरट्यांनी तब्बल 15 दुकाने फोडल्याने खळबळ माजली आहे. बोरिवली पश्चिम परिसरामधील आय. सी. कॉलनीमध्ये मोबाईल शॉप, सलून तसेच सुपरमार्केट यांसारखी तब्बल 15 दुकाने लुटून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
यासंदर्भातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून पुढील तपास सुरू आहे.
पहाटेच्या वेळेस दुकानांचे शटर तोडून चोरी करण्यात आल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. यामध्ये ३ ते ४ जणांची टोळी सक्रिय असल्याचे प्राथमिक तापासात समोर आले असून, एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. खबरदारीच्या उपायासाठी पोलिसांनी आय. सी. कॉलनी परिसरात गस्त वाढवली आहे. लवकरच या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करणार असल्याची माहिती शहर पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली.