मुंबई - येस बँक अडचणीत असतानाही त्या बँकेत मुंबई विद्यापीठाच्या ठेवण्यात आलेल्या 140 कोटींच्या ठेवी आणि त्यासाठीच्या जबाबदारीवर आज सिनेटमध्ये तीव्र पडसाद उमटले. या ठेवीच्या निर्णयासंदर्भात कुलगुरू प्र-कुलगुरू आदी प्रमुख जबाबदारी असताना उपकुलसचिव यांना या प्रकरणात बळीचा बकरा बनविण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी विद्यापीठाने संबंधित उपकुलसचिवाला सिनेट बैठकीपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठवल्याने यावर सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. यामुळे विद्यापीठ प्रशासनाची मोठी कोंडी झाली होती.
मुंबई विद्यापीठात मागील काही महिन्यांपासून कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांची मनमानी सुरू आहे. त्यामुळेच येस बँक अडचणीत असताना 140 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत का ठेवण्यात आल्या, असा सवाल सिनेट सदस्यांकडून उपस्थित करण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 140 कोटी रुपयांच्या ठेवी प्रकरणात कुलगुरू आणि उपकुलगुरू यांनी स्वतःचा बचाव करत यासाठीचे निर्णय करणाऱ्या एका उपकुलसचिवांना मागील काही दिवसांपासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कोणतेही कारण सिनेटमध्ये न देता आपला बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे ही सांगण्यात आले.
मुंबई विद्यापीठाची सिनेट बैठक आज ऑनलाईन झाली. या बैठकीत येस बँक येथे 140 कोटी रुपयांच्या ठेवलेल्या ठेवीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर त्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल पटलावर ठेवण्यात आला. यावेळी बुकटूचे सिनेट सदस्य अत्यंत आक्रमक झाले होते. त्यांनी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट 2016 मधील कलम 94 (2) अंतर्गत गठीत केलेल्या समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
140 कोटी रुपयांच्या ठेवीचा प्रकार घडत असताना फायनान्स आणि अकाउंट समिती शांत का होती? हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपण कुटुंबांमध्ये चाळीस पन्नास हजाराची फिक्स डिपॉझिट करीत असताना कुटुंबातील इतर सदस्यांना विचारात घेतो. मात्र 140 कोटी रुपयांच्या ठेवीचा प्रकार एकटाच माणूस कसा करू शकतो? असा सवाल करत कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांना धारेवर धरले. ठेवीच्या प्रकरणात एकूणच सिनेट सदस्यांनी याबद्दल ही शंका व्यक्त केली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सर्व संबंधित व्यक्तीवर एफआयआर नोंदवून त्याच्याकडून या प्रकरणांमध्ये कोण कोण व्यक्ती समाविष्ट आहेत, यांचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून यातील अधिक सत्य बाहेर काढावे अशी मागणी डॉक्टर राजे यांनी केली व इतर सदस्यांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिल्याची माहिती सदस्यांकडून देण्यात आली.